• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

Fourth Annual Day

एप्रिल २०१६ हा चैतन्य सह्निवासचा ४ था वर्धापन दिन. अर्थातच हा दिवस साजरा करण्यासाठी संस्थेचे चालक मंडळ कार्यकारी व्यक्ती संस्थेचे विद्यमान रहिवासी आणि हितचिंतक मित्र हे सारेच उत्सुक होते. कार्यक्रमासाठी अध्यक्षही सर्वांनाच प्रिय, प्रसिद्ध, कर्तबगार अशी अभिनेत्री सौ मृणाल कुलकर्णी ह्या येत असल्याचे कळले आणि संस्थेशी संबंधित साऱ्यांनाच उत्साहाचे भरते आले.
३ तारखेला सकाळी ठीक दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहनिवासातील रहिवासी, त्यांचे खास आमंत्रित केलेले नातेवाईक आणि मित्र यांनी आधीच सहनिवास गच्च झाला होता. ठीक दहा वाजता श्री . 'सुनील गोडबोले' यांनी शिट्टीवर प्रार्थनेचे अगदी गायल्यासारखे वाटावेत असे मंजुळ सुर काढायला सुरुवात केली आणि श्रोतृवृंद नाद्सागरात पार बुडून गेला. लोकप्रिय सिनेसंगीत, भावगीतांच्या सुरांवर एकापाठोपाठ एक अशी गाणी ते वाजवीत रहिले. टाळ्यांच्या कडकडाटाने सारे सभागृह निनादले. श्री. गोडबोले यांच्या सुरेलपणा आणि दमसास राखण्याला श्रोत्यांची चांगलीच दाद मिळाली. थंडगार पन्ह्याच्या ग्लासाने सभेला चविष्ट व थंडगार विश्रांती मिळाली . त्यानंतर चैतन्य सहनिवासाची सेविका अर्चना, निवासिनी श्रीमती रेगे व विश्वस्त लीनाताई देवस्थळी यांनी स्नेहपूर्ण आणि मनापासून मनोगते सांगितली .
अध्यक्ष सौ. मृणाल कुलकर्णी वेळेवर हजर होत्याच. त्यांनी अगदी मैत्रिणी सारख्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या. त्यांची मुलाखत घेतली दीपा देवस्थळी यांनी. अभिनेत्री असल्याचा जराही वेगळेपणा मृणालताई यांनी दाखविला नाही. नुकत्याच लागून गेलेल्या 'राजवाडे आणि सन्स' या श्री देवस्थळी निर्मित चित्रपटात त्या असल्याने कार्यक्रम अगदी घरचाच वाटला. आपल्या सुरवातीच्या दूरदर्शन मालिकांचे तसेच चित्रपटात अभिनेत्री पासून ते लेखिका व दिग्दर्शिका हा त्यांचा प्रवास त्यांनी रंजकतेने उलगडून दाखविला. सर्व कलाकारांचा सत्कार कुंडीत लावलेले झाड देवून करण्याचे नाविन्य चैतन्यने यावेळी दाखविले. त्यानंतर सर्वांनी सात्विक व चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. तृप्त आणि खुश होवून पाहुण्यांनी चैतन्याचा निरोप घेतला. एकदा चार आठ दिवस तरी येथे रहायला यायचंच असा मनोमन निश्चय करूनच!