मथुरा फाऊंडेशन, जे व्ही गोकळ चॅरिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जून २०२४ या दिवशी जांभुळपाडा येथे मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. जांभुळपाडा मधील स्थानिक लोकसंख्येमधील १८ ते ७० या वयोगटात ऍनिमिया, थायरॉईड ग्रंथींचे आजार तसेच मधुमेह या आजारांचे प्रमाण किती आहे हे शोधण्यासाठी हे रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या तिन्ही आजारांचे लवकर निदान होऊन त्यावर आवश्यकतेनुसार औषधयोजना करून हे आजार नियंत्रित करण्याचाही हेतू या शिबिरामागे होता.
यासाठी फडके लॅबोरेटरी या पॅथॉलाजी लॅब च्या मदतीने Haemogram, HBA1C आणि थायरॉईड अशा तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये ४४ जण सहभागी झाले. ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी आढळले, किंवा ज्यांचे मधुमेहाचे निदान या तपासणीद्वारे करण्यात आले व ज्यांना थायरॉईड संबंधित आजार आढळून आले अशा सर्वांना योग्य तो आहार आणि जीवनशैलीतील बदल याविषयी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. तसेच अशा पेशंटना इतर तपासण्या आणि पुढील उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मधुमेह तज्ज्ञ तसेच थायरॉईड च्या आजारांसाठी एंडोक्रायनोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला.
या रक्त तपासणी शिबिराद्वारे ग्रामीण लोकांमध्ये जुनाट आजारांबाबत माहिती आणि जागरूकता, अशा आजारांचे लवकर निदान करून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले.
अशाच प्रकारे आणखी दोन मोफत रक्त तपासणी शिबिरे मथुरा फाऊंडेशन आणि जे व्ही गोकळ चॅरिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २४- २५ ऑक्टोबर २०२४ आणि २२ नोव्हेंबर २०२४ या दिवशी जांभुळपाडा येथेच घेण्यात आली. या शिबिरांमध्ये ६१ जणांनी सहभाग घेतला आणि आधीच्या शिबिराप्रमाणे याही शिबिरांमध्ये गरजूंना आहार, जीवनशैली आणि आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी त्या त्या तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले.