या चैतन्य सहनिवासचे 'चैतन्य' हे नाव सार्थ वाटतं कारण इथे पाऊल ठेवल्यावरच चैतन्य जाणवत; प्रसन्न वाटतं!! भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असलेली इथली वास्तू रचना आहे. इथली स्वच्छता, टापटीप लक्ष वेधून घेते. ज्येष्ठ नागरिकांना वावरायला सोयीस्कर अशी खोल्यांची आणि इमारतीची रचना आहे. ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी खेळ, करमणूक, वाचन याचे अनेक पर्याय, सोयी इथे उपलब्ध आहेत. रुचकर, पौष्टिक अशी भोजन व्यवस्था आहे. अगत्यशील असा कर्मचारी वर्ग आहे.
समाजाच्या ऋणातून काही अंशी उतराई व्हावं या विचारातून २०१२ साली लीना देवस्थळी यांनी आपल्या पतीच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने या ज्येष्ठ नागरिक सहनिवासाची सुरवात केली. सध्या इथे वाजवी दरात 'शारीरिक दृष्टया अवलंबून नसलेल्या' ३० ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. लीनाताईंच्या सजग नेतृत्वाखाली हा सहनिवास उत्तमरित्या नांदतो आहे.
राहुल पटवर्धन याचा लीना देवस्थळी यांच्याशी २०१४ सालापासून परिचय आहे. राहुलच्या पुढाकारानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आपल्या मुला-नातवंडांचे कौतुक करावं तसं आमच्या कार्यक्रमाचे कौतुक करणारे, आमच्या सोबत फोटो काढून घेणारे हे आजी-आजोबा पाहिले की बा.भ.बोरकरांच्या कवितेची ही ओळ आठवते
'आता आयुष्याची झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा!'
Photo Credit : Ameya Bapaye



.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)