• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

चैतन्य' चा अकरावा वर्धापनदिन

चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास'चा अकरावा वर्धापनदिन १९ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात पार पडला. 'चैतन्य' मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला दारात सुरेख आणि सुबक रांगोळी काढण्यात आली होती. तसंच नुकतीच दिवाळी होऊन गेल्यामुळे आकाशकंदील आणि पणत्याही ठेवण्यात आल्या होत्या. 'चैतन्य' या नावाला साजेसं उत्साहवर्धक वातावरण सगळीकडे प्रत्ययास येत होतं.

'चैतन्य' मधील ज्येष्ठ निवासी श्री. अनिल बाळ यांच्या प्रास्ताविकाने वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर 'चैतन्य'च्या संस्थापक आणि विश्वस्त लीना देवस्थळी, इतर विश्वस्तांपैकी श्री. अरुण काळे, केअर टेकर श्री. काळवीट यांच्या पत्नी सौ. अंजली काळवीट, सेविका भारती सोगम आणि वयाने सर्वात ज्येष्ठ (शंभरी पार केलेल्या !) अशा निवासी श्रीमती घाटणेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्व सेविकांनी ईशस्तवन सादर केले. 'चैतन्य' मधील निवासी सौ. कुटुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेविकांनी ही प्रार्थना सादर केली. या नंतर 'चैतन्य'च्या निवासींपैकी सौ. पुष्पा फिरके यांनी आपल्या 'चैतन्य' मधील वास्तव्याबद्दलचे अनुभव उत्स्फूर्तपणे मांडले. सेविकांच्या वतीने आपले अनुभव सौ. सपना शिंदे यांनी मांडले तर विश्वस्तांच्या वतीने प्रिया देवस्थळी यांनी आपला 'चैतन्य' मधला स्वयंसेवक असण्यापासून ते विश्वस्त होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. 'चैतन्य' मधील निवासी आणि सेवक-सेविकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांसाठीचा बक्षीस वितरण समारंभ यानंतर पार पडला.कार्यक्रमाच्या या भागाचे निवेदन विश्वस्त मुग्धा आपटे यांनी केले. बक्षीस वितरण डॉ वीरेंद्र तुळजापूरकर आणि डॉ श्रद्धा उपासनी यांच्या हस्ते पार पडले.

यानंतर मुंबई स्थित 'सूत्रधार' या संस्थेच्या वतीने आयोजित 'आई' या विषयावरील कविता, कथा, गाणी असा एक बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल हर्डीकर आणि अनुपमा ताकमोगे यांनी केलं. 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या शीर्षक गीतापासून(गायिका चैत्राली पोतदार) ते 'गुणी बाळ असा जागसि कां रे वाया' 'आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' वा 'लिंबलोण उतरू कशी' ,' आई तुझी आठवण येते' इथपासून ते अलीकडच्या 'तारें जमीं पर' मधील 'मेरी माँ' या सारख्या लोकप्रिय गाण्यांचं सादरीकरण अर्चना गोरे, ज्ञानेश पेंढारकर, आनंद सावंत या प्रतिभावान गायक-गायिकांनी केलं. अनुपम ताकमोगे यांनी आई याच विषयावर मंगला गोडबोले यांच्या कथेचं नाट्यमय प्रस्तुतीकरण देखील केलं. उत्तरोत्तर रंगात जाणारा हा कार्यक्रम संपूच नये अशीच उपस्थित श्रोत्यांची भावना होती.

यानंतर 'चैतन्य' चे विश्वस्त श्री. शिरीष घोगे यांनी आभार प्रदर्शनाचं भाषण केलं.नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम असल्याने यावेळी 'चैतन्य' च्या वतीने वऱ्हाड जांभुळपाडाच्या आजी आणि माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला. रुचकर आणि सुग्रास भोजनाने वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.