• +91 - 7738 342 065
  • chaitanyajambhulpada@gmail.com

'चैतन्य' चा दहावा वर्धापन दिन

'चैतन्य' चा दहावा वर्धापन दिन नेहमीच्या उत्साहात १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत 'चैतन्य' चे निवासी श्री. अनिल बाळ यांनी नेहमीच्याच सफाईने केले. त्यानंतर 'चैतन्य' चे विश्वस्त श्री. शैलेश राजाध्यक्ष, केअर टेकर हेमाताई घाटणेकर, सेवक सुभाष सोगम, सेविका दर्शना आणि येथील ज्येष्ठ निवासी श्रीमती बिवलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं.यानंतर 'चैतन्य' च्या सर्व सेविकांनी एक ईशस्तवन सादर केलं.

'चैतन्य' च्या गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीचा मागोवा आणि वेध घेणारी एक चित्रफीत उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. या चित्रफितीची संकल्पना प्रिया देवस्थळी यांची तर चित्रफितीचं दिग्दर्शन श्रीधर देवस्थळी यांचं आहे. चित्रफीत पाहत असताना कित्येकांच्या डोळ्यासमोर 'चैतन्य'चा आजवरचा संपूर्ण प्रवास उलगडून त्यांना नॉस्टॅलजिक वाटलं. ही चित्रफीत चैतन्यच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

यानंतर डॉ मधुबाला चिंचाळकर यांचं त्यांच्या अंटार्टिका येथील एक वर्ष वास्तव्या- दरम्यान आलेल्या अनुभवांवर आधारित दृक-श्राव्य सादरीकरण झालं. हा एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम होता. सर्व प्रेक्षकांशी डॉ चिंचाळकर अनौपचारिकपणे संवाद साधत होत्या. त्यातून अंटार्टिका येथील सततच्या बर्फाळ हवामान, खडतर वातावरण आणि मर्यादित संसाधने या सारख्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून , एक वर्ष राहून केलेल्या संशोधनाविषयीचे त्यांचे रोमांचक आणि थरारक अनुभव ऐकून सर्व प्रेक्षकांच्या अंगावर काटाच आला ! कल्पनेपलीकडच्या एका संपूर्ण वेगळ्याच जगाची ओळख या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना झाली.

यानंतर चैतन्य मध्ये गेल्या वर्षात निवासी आणि सेविकांसाठी घेतलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना डॉ मधुबाला चिंचाळकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. मग 'चिं सौ कां रंगभूमी' आणि इतर संगीत नाटकांमधील सुप्रसिद्ध गायिका केतकी चैतन्य आणि पं संजीव अभ्यंकरांचे शिष्य धनंजय म्हसकर यांच्या हिंदी-मराठी गाण्यांचा बहारदार आणि उत्तरोत्तर रंगत जाणारा कार्यक्रम झाला.

रुचकर भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी निवासींचे नातेवाईक, पुणे, मुंबई, ठाणे येथील 'चैतन्य' चे हितचिंतक, सन्माननीय पाहुणे, जांभुळपाडा मधील अन्य वृद्धाश्रमांमधील पदाधिकारी, निवासी असा मोठा प्रेक्षकवर्ग उपस्थित होता.